ताज्या घडामोडी

*नागरी विकास कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

*आरमोरी व वडसा उपविभाला भेट*

*रामसागर तलाव, क्रीडा संकुल व पाणीपुरवठा योजनांची पाहणी*

गडचिरोली, (जिमाका) दि. 24 : आरमोरी व वडसा शहरातील
विकास कामे लोकाभिमुख पद्धतीने, गुणवत्तेला प्राधान्य देत व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिले.

जिल्ह्यातील नागरी विकास कामांना गती देण्यासाठी आरमोरी व वडसा (देसाईगंज) शहरातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. आरमोरी शहराच्या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद येथे विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसेणजित प्रधान, तहसीलदार उषा चौधरी, मुख्याधिकारी प्रितीश मगरे, नगराध्यक्ष रुपेश पुणेकर व नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यानंतर त्यांनी शहरातील रामसागर तलावाच्या सौंदर्यीकरणासंदर्भात तसेच तालुका क्रीडा संकुल परिसर विकसित करण्यासाठी प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. नगर परिषद क्षेत्रातील महसूल विभागाच्या जागा विविध विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने सविस्तर प्रस्ताव सादर करावेत, तसेच नगर परिषद प्रशासकीय इमारतीसाठी नियोजनबद्ध प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम विहीत कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे व गुणवत्तेची तडजोड होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, देसाईगंज (वडसा) तालुक्यातील शिवराजपूर येथे जिल्हाधिकारी यांनी पानंदन रस्त्याची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेबाबत आवश्यक सूचना दिल्या. तसेच आयोजित रक्तदान शिबिराला भेट देत सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. प्रभारी तहसीलदार एन.टी. कुमरे उपस्थित होते.

यावेळी प्रशासनातील व विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button