ताज्या घडामोडी

*‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ जिल्ह्यात उत्साहात; विविध मंडळांमध्ये नागरिकांच्या महसुली समस्या निकाली*

*बाम्हणी, येणापूर येथे आमदार डॉ. मिलिंद नरोटे तर देऊळगाव येथे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते लाभ वितरण*

गडचिरोली, (जिमाका) दि. १४ :
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा-१)’ अंतर्गत आज दिनांक १४ मार्च २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमधून नागरिकांच्या महसुली तक्रारी, प्रलंबित प्रकरणे तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले.

जिल्ह्यातील बाम्हणी (ता. गडचिरोली), पेरमिल्ली (ता. अहेरी), येणापूर (ता. चामोर्शी), देऊळगाव (ता. आरमोरी), मालेवाडा (ता. कुरखेडा), बेळगाव (ता. कोरची), पेंटीपाका (ता. सिरोंचा), ताडगाव (ता. भामरागड), सुरसुंडी (ता. धानोरा) व कोटमी (ता. एटापल्ली) या महसूल मंडळांमध्ये ही शिबिरे घेण्यात आली.

या शिबिरांमध्ये विविध महसूल सेवा, प्रमाणपत्रे, नोंदवही दुरुस्ती, वारस नोंद, उत्पन्न व जातीचे दाखले, जमीन नोंदी संदर्भातील प्रकरणे, तसेच शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन व लाभ वितरण करण्यात आले.

येणापूर (ता. चामोर्शी) येथे आयोजित शिबिरात आमदार डॉ. मिलिंद नरोटे हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यात आले.

त्याचप्रमाणे देऊळगाव (ता. आरमोरी) येथे आयोजित शिबिरात आमदार रामदास मसराम यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे व शासकीय योजनांचे लाभ प्रदान केले. त्यांनी प्रशासनाने अशा शिबिरांच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडविण्याचा घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील इतर मंडळांमध्येही संबंधित महसूल अधिकारी, तहसील प्रशासन व विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या अर्जांची तत्काळ छाननी करून अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थी या शिबिरांमध्ये सहभागी झाले.

दरम्यान, या अभियानांतर्गत १० एप्रिल, १७ एप्रिल, २४ एप्रिल, ८ मे व १५ मे २०२६ या नियोजित तारखांना जिल्ह्यातील इतर महसूल मंडळांमध्येही अशाच प्रकारे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ आयोजित करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांनी या शिबिरांचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button