ताज्या घडामोडी

*गडचिरोलीच्या भरडधान्यांना आंतरराष्ट्रीय ओळख : ‘कोया कृषी कुंभ २०२६’मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम*

गडचिरोली, (जिमाका) दि. ०८ :
कृषी संस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘कोया कृषी कुंभ २०२६’ या भव्य कृषी महोत्सवात आज एक ऐतिहासिक क्षण साकार झाला. प्रसिद्ध आचारी विष्णु मनोहर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ११११ किलो नाचणीचा शिरा तयार करून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला. या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भरडधान्ये, विशेषतः नाचणी पिकाचे पोषणमूल्य आणि महत्त्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले.

आदिवासी व दुर्गम भागातील पारंपरिक शेती आणि स्थानिक कृषी उत्पादनांना जागतिक ओळख मिळावी, हा या विक्रमामागील मुख्य हेतू होता. नाचणीपासून तयार करण्यात आलेल्या या महाकाय शिऱ्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये घेण्यात आली आहे. या विक्रमासाठी वापरण्यात आलेली नाचणी ही गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शाश्वत पद्धतीने उत्पादित करण्यात आली होती.

या ऐतिहासिक उपक्रमाच्या तयारीसाठी मागील १५ दिवसांपासून विशेष नियोजन करण्यात आले होते. शिरा तयार करताना पाणी, गूळ, तूप, चारोळी, ड्रायफ्रुट्स आदी पारंपरिक व पौष्टिक घटकांचा वापर करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेची प्रत्यक्ष उपस्थित राहून रेकॉर्ड संस्थांच्या प्रतिनिधींनी काटेकोर तपासणी केली.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी एम. अरूण यांच्यासह जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शेतकरी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या कृषी परंपरेला आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मेहनतीला एक आगळीवेगळी ओळख मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश भरडधान्यांच्या पिकांना जागतिक ओळख देणे, त्यांचे पोषणमूल्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा असल्याचे प्रकल्प संचालक, आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी सांगितले. ‘कोया कृषी कुंभ’मुळे गडचिरोलीच्या कृषी परंपरेचा जागतिक पटलावर ठसा उमटत असून, हा उपक्रम भविष्यातही प्रेरणादायी ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button