ताज्या घडामोडी

*शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या माय-लेकावर गुन्हा दाखल करण्याचे तहसीलदारांचे आदेश*

गडचिरोली:
शेतात जाणारा रस्ता मोकळा करण्याच्या शासकीय प्रक्रियेत अडथळा निर्माण करून अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी, गडचिरोलीच्या तहसीलदारांनी एका महिलेसह तिच्या मुलावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे मौजा पारडी कुपी परिसरात खळबळ माजली आहे.

*नेमकी घटना काय?*
मिळालेल्या माहितीनुसार, मौजा पारडी कुपी येथील शेत जमीन गट क्र. ७४६/१ चे मालक श्री. शरद तुकाराम लोंढे यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मंजूर करण्यात आला होता. या रस्त्यातील अडथळा दूर करण्यासाठी नायब तहसीलदार चंदू प्रधान यांचे नेतृत्वात मंडल अधिकारी, आर पी शिडाम, ग्राम महसूल अधिकारी एम के इचकापे आणि पोलिसांचे पथक दि. २३ जानेवारी २०२६ रोजी घटनास्थळी पोहोचले.

*JCB समोर झोपून जाळण्याची धमकी*
प्रशासकीय पथक रस्ता मोकळा करण्याचे काम करत असताना, शेजारील शेत जमीन (गट क्र. ५८९) मालक श्रीमती उमाबाई मोतीराम नागापुरे यांनी रस्ता देण्यास तीव्र विरोध केला. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांनी थेट सुरू असलेल्या JCB मशीनसमोर आडवे होऊन काम रोखले. “रस्ता तयार केल्यास जेसीबी जाळून टाकीन,” अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली.

*मुलाने कुऱ्हाड घेऊन केला हल्ला करण्याचा प्रयत्न*
या वादात उमाबाई यांचा मुलगा श्री. विलास मोतीराम नागापुरे हा देखील सामील झाला. त्याने हातात कुऱ्हाड घेऊन शासकीय पथकाला अडविले आणि कामात अडथळा निर्माण केला. या माय-लेकांच्या हिंसक पवित्र्यामुळे प्रशासनाला मंजूर रस्त्याचे काम पूर्ण करता आले नाही.
भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई
शासकीय आदेशाचे उल्लंघन आणि कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी सागर कांबळे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी गडचिरोली यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. विनोद चव्हाण पोलीस निरीक्षक यांनी भारतीय न्याय संहिता (BNS)- २०२३ च्या कलम २२३ नुसार संबंधितांवर गुन्हा (FIR) दाखल केले आहे.पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button