*आपला विदर्भ संस्थेचे चौथे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले* *डॅा. मिर्झा रफी बेग यांना नवी मुंबईत श्रद्धांजली*

नवी मुंबई- नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील वैदर्भीयांची संघटना असलेल्या आपला विदर्भ सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेचे चौथे स्नेहसंमेलन खारघर येथे अलिकडेच उत्साहात पार पडले.
नवी मुंबईतील वैदर्भियांना आपली संस्कृती जपता यावी आणि संघटित होऊन सामाजिक क्षेत्रात कार्य करता यावे या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संघटनेचा सातत्याने विस्तार होत आहे.
या संघटनेचे चौथे स्नेहसंमेलन खारघर येथील उत्कर्ष सभागृहात शनिवारी २९ नोव्हेंबर रोजी पार पडले. या संमेलनास मोठ्या संख्येने वैदर्भियांनी उपस्थिती लावली.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजवलेले वैदर्भीय आणि गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याचे अध्यक्ष स्थान माजी न्यायाधीश व राज्याचे माजी धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी भुषविले. आपला विदर्भ संस्थेचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कोहाड, कोषाध्यक्ष अनंत शिंदे आणि तरारे यांच्या हस्ते कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
९४ वर्षीय तरूणाचा सत्कार
विविध सामाजिक उपक्रमात ९४ व्या वर्षीही तरूणाईला लाजवेल अशा उत्साहात सक्रिय सहभागी होणारे यशवंतराव ठाकरे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मूळ चंद्रपूरचे असलेले ठाकरे काही वर्षे नागपूर महानगरपालिकेत नोकरी केल्यानंतर १९७९ साली मुंबईत हाफकिन संस्थेत अधिकारी पदावर रूजू झाले. निवृत्तीनंतर ते पनवेल येथे स्थायिक झाले. सत्काराला उत्तर देताना ठाकरे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत बालपणी भजन गायल्याची आठवण सांगितली.
यावेळी अध्यक्ष कोहाड यांनी संघटनेची स्थापना आणि आजवरची वाटचाल यांची माहिती दिली. सरचिटणीस प्रमोद चुंचूवार यांनी संस्थेच्या भावी उपक्रमांची माहिती देत अधिकाधिक संख्येने आजीव सदस्यत्व प्राप्त करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
नवी मुंबईत भूखंड खरेदी आणि गुंतवणुकीची संधी याबद्दल मनोज ठाकरे यांनी विस्तृत माहिती दिली.
यावेळी सदस्यांचे परिचय सत्र पार पडले.
*कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार*
यावेळी स्टार प्रवाहचे कार्यकारी निर्माता नरेंद्र मुधोळकर यांना मनोरंजन क्षेत्रातील योगदानासाठी, समाजसेविका वैशाली पाटील यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी, कर्करोग उपचार आणि संशोधनासाठी कर्करोग तज्ञ्ज डॅा. राजेश शिंदे यांचा, श्वसनाच्या आजारांवरील उपचारांसाठी डॅा. विनोद चव्हाण यांचा, डिजिटल जाहिरात क्षेत्रातील योगदानासाठी प्रशांत काळे यांचा सत्कार करण्यात आला. अमेरिकेत जाऊन तेथील तंत्रज्ञांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांची उत्पादकता वाढवणारे जेएसडब्लू कंपनीचे अभियंता आशिष हेडाऊ आणि कोरियात झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी स्पर्धेत विजेतेपद मिळवणारे डॅा. अनिल नहाते यांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसाठी गौरविण्यात आले. १० आणि १२ वीची परीक्षा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
*सांस्कृतिक कार्यक्रम*
यावेळी आपला विदर्भ संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी सादर केलेल्या गीतांनी या कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. सदस्यांच्या कुटुंबातील बाळ गोपाळांनी नृत्य व गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. उपाध्यक्ष अश्विनी हडपे, कार्यकारिणी सदस्य सुरेश डाखोळे, गायिका एकता ठाकरे, विरेंद्र कठाणे यांनी या संगीत संध्येसाठी पुढाकार घेतला. त्यांनी गायलेल्या गीतांनी उपस्थितींची मने जिंकून घेतली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव राजेंद्र नंदनकर, उपाध्यक्ष किशोर गुल्हाने व अश्विनी हडपे, कार्यकारिणी सदस्य प्रशांत जांभूळकर, अनिल नहाते, राजेश सोनकुसरे, विरेंद्र कठाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
*चौकट*
*डॅा. मिर्झा रफी बेग यांना श्रद्धांजली*
वऱ्हाडी भाषेला देश आणि विदेशात लोकप्रिय करणारे वऱ्हाडी कवी डॅा. मिर्झा रफी अहमद बेग यांचे या कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदरच निधन झाले. त्यांच्या योगदानाला या सोहळ्यात मानाचा मुजरा करण्यात आला आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गजानन झोडपे यांनी मिर्झा यांचा जीवन परिचय कथन केला.



