ताज्या घडामोडी

*पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडती १० ऑक्टोबरला*

गडचिरोली, (जिमाका) दि. ७ :
ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या दिनांक १७ सप्टेंबर २०२५ च्या पत्रान्वये गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार आरक्षण सोडत येत्या १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात काढण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील एकूण १२ पंचायत समित्यांपैकी देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी आणि मुलचेरा या पाच पंचायत समित्या संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रात न मोडणाऱ्या आहेत. त्यामुळे या पंचायत समित्यांतील सभापती पदांसाठी एक पद अनुसूचित जाती (महिला), एक पद अनुसूचित जमाती (पहिला), दोन पदे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, आणि एक पद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) या वर्गांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, कोरची, कुरखेडा, धानोरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या सात पंचायत समित्या संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रात येतात. त्यामुळे या समित्यांतील सभापती पदांसाठी तीन पदे अनुसूचित जमाती आणि चार पदे अनुसूचित जमाती (महिला) वर्गासाठी राखीव करण्यात आली आहेत.

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व १२ पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याची सोडत पारदर्शक पद्धतीने घेण्यात येणार आहे.
या सोडतीस उपस्थित राहण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांनी वरील ठिकाणी व वेळेस उपस्थित राहावे, असे प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (सामान्य) सौ. स्मिता बेलपत्रे यांनी कळविले आहे.

००००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button