*जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन’ साजरा*

गडचिरोली, दि. 29 सप्टेंबर (जिमाका):
शासकीय कार्यालयांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे काटेकोरपणे पालन करून कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि जबाबदारी जपण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले. त्यांनी स्पष्ट केले की, “हा कायदा नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा असून, लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यालयाने प्रामाणिकपणे त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.”
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा प्रभावी अंमल आणि जनजागृती यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन” साजरा करण्यात आला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सौ. स्मिता बेलपत्रे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते.



