ताज्या घडामोडी

गडचिरोली ला दक्षिण भारताचे प्रवेशव्दार करणार – मुख्यमंत्री

न्युज, गडचिरोली ( दि.२९ नोव्हेंबर)

गडचिरोली वेगाने बदलत आहे, आज हा जिल्हा ‘नेक्स्ट स्टील हब’ म्हणून ओळखला जातोय. तब्बल ३ लाख कोटींची गुंतवणूक येथे येत आहे. आम्ही आधुनिक गडचिरोली घडवतो आहोत, पण त्याच वेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्वप्नातील ‘जल-जमीन-जंगल’ आणि भूमिपुत्रांच्या हिताचे संरक्षण हेच आमचे प्रथम कर्तव्य राहणार आहे. कौशल्यविकास, वैद्यकीय शिक्षण, नवीन उद्योग, सर्व सुविधांनी युक्त गडचिरोली उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या सर्वासोबतच, शहराच्या विकासात गडचिरोली मागे राहू नये म्हणून येत्या काळात ‘बाह्य रिंग रोड’ मंजूर होईल. भारताचे प्रवेशद्वार म्हणून गडचिरोलीचे भविष्य आता दूर नाही. असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर, आरमोरीमध्ये रुपेश पुणेकर आणि देसाईगंज (वडसा)मध्ये लता सुंदरकर तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य जाहीर सभेमध्ये बोलत होते.

शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन १३० कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेलाही लवकरच मान्यता देणार आहोत. प्रत्येक घरात ३६५ दिवस नळाद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हा आमचा निर्धार आहे, याचा एक टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा सुरु होणार आहे. भुयारी गटारांची कामेही याच वेगाने पुढे नेऊ.

लांजेडा, गोकुळ नगर, विवेकानंद नगर, इंदिरा नगर यांसारख्या भागातील नागरिकांकडे जमिनींचे मालकीहक्क नसल्यामुळे त्यांना घरकुल योजना मिळत नव्हती. काही महिन्यांपूर्वी आम्ही सर्व अतिक्रमण नियमित करण्याचा मोठा निर्णय घेतला. आता मोजणी करून हे पट्टे देण्यात येतील आणि ज्यांच्याकडे कच्ची घरे आहेत, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २. ५ लाख देऊन पक्की घरे बांधून दिली जातील.

उद्योगांसाठी जमिनी लागतील, परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे, आम्ही एकाही शेतकऱ्याचे नुकसान होऊ देणार नाही. योग्य मोबदला आणि सन्मानपूर्वक पुनर्वसन झाल्याशिवाय कोणताही प्रकल्प पुढे जाणार नाही, हा माझा शब्द आहे.

यावेळी भव्य जाहीर सभेला आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार बंटी भांगडिया, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, प्रशांत वाघरे माजी जिल्हाधक्ष, रमेश भुरसे किसान आघाडी, बाबुराव कोहळे जेष्ठ नेते, प्रमोद पिपरे लोकसभा समन्वयक , योगिता पिपरे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button