*“सेवा पंधरवाडा”तून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय सेवा – पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची माहिती*

गडचिरोली, दि. १६ (जिमाका) : महसूल विभागातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा” राबविण्यात येणार आहे. महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख बनवून या पंधरवड्यात शेवटच्या घटकापर्यंत शासकीय सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी काल सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या अभियानांतर्गत तीन टप्प्यांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्यामध्ये प्रामुख्याने पाणंद रस्ते मोहीम, सर्वांसाठी घरे व पट्टे वाटप मोहीम तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे.
पहिला टप्पा (१७ ते २२ सप्टेंबर २०२५) – पाणंद रस्ते मोहीम :
या टप्प्यात पाणंद/शिवार रस्त्यांना क्रमांक देणे, त्यांचे सर्वेक्षण करणे, गाव नकाशावर चिन्हांकित करणे व त्यांची नोंद करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्रे घेणे तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी “रस्ता अदालत” आयोजित करण्यात येणार आहे.
दुसरा टप्पा (२३ ते २७ सप्टेंबर २०२५) – सर्वांसाठी घरे व पट्टे वाटप मोहीम :
या टप्प्यात “सर्वांसाठी घरे” या उपक्रमांतर्गत उपलब्ध शासकीय जमिनींचे घरकुलासाठी पट्टे वाटप केले जाणार आहेत. त्याचबरोबर शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित करून पात्र लाभार्थ्यांना जमिनींचे पट्टे वाटप करण्यात येणार आहे.
तिसरा टप्पा (२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५) – नावीन्यपूर्ण उपक्रम :
या टप्प्यात शालेय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, डोमिसाईल आदी दाखले वितरित केले जाणार आहेत. तसेच “लक्ष्मी मुक्ती योजना” अंतर्गत महिलांची नावे घरातील मालमत्तेत समाविष्ट करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. यासोबतच एकाच सातबाऱ्यावर असलेल्या अनेक नावांची फोड करून मागणीनुसार वेगवगळे सातबारे तयार करून देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची’ माहिती दिली.
जिल्ह्यात या अभियानाचा शुभारंभ १७ सप्टेंबर, २०२५ रोजी गडचिरोली तालुक्यातील दिभना ग्रामपंचायत येथे आयोजित ग्रामसभेतून करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना तालुका स्तरावर प्रथम क्रमांकासाठी १५ लाख, द्वितीय १२ लाख, तृतीय ८ लाख तसेच दोन विशेष ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५ लाख इतके रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर प्रथम ५० लाख, द्वितीय ३० लाख व तृतीय २० लाख तर विभागीय स्तरावर प्रथम १ कोटी, द्वितीय ८० लाख व तृतीय ६० लाख इतकी पारितोषिके निश्चित आहेत. राज्यस्तरावर ग्रामपंचायतींना प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी व तृतीय २ कोटींचे भव्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. पंचायत समितीसाठी विभागीय स्तरावर प्रथम १ कोटी, द्वितीय ७५ लाख व तृतीय ६० लाख तर राज्यस्तरावर २ कोटी, १.५ कोटी व १.२५ कोटींचे पुरस्कार निश्चित आहेत. जिल्हा परिषदेसाठी राज्यस्तरीय प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी व तृतीय २ कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी ठेवण्यात आला आहे.
गावाच्या शाश्वत विकासासाठी या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.
—