*विकसित महाराष्ट्र सर्वेक्षणात सहभाग नोंदवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे नागरिकांना आवाहन*

गडचिरोली, दि.१४ (जिमाका) : भारत सरकारच्या ‘विकसित भारत २०४७’ या दूरदृष्टी कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने विकसित महाराष्ट्र २०४७’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये विकसित महाराष्ट्र २०४७ करिता व्हिजन डॉक्युमेन्ट तयार करण्यात येणार असून त्यासाठी नागरिकांनी https://wa.link/o93s9m या लिंक वर माहिती भरून आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सर्व तालुक्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना या मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्याच्या सूचना दूरदृष्य प्रणाली द्वारे दिल्या. अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
विकसित महाराष्ट्रासाठी व्हिजन डॉक्युमेन्ट तयार केला जात आहे, ज्यामध्ये कृषी व संलग्न क्षेत्र, उद्योग व सेवा, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रशासन व पर्यावरणीय इत्यादी क्षेत्रांच्या क्षेत्रनिहाय अभ्यास समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विविध खात्यांचे मंत्री यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्ह्यांमध्ये जनतेचा सहभाग घेऊन व्यापक चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. जनतेच्या सूचना, गरजा व अपेक्षा लक्षात घेऊन सदर व्हिजन डॉक्युमेन्ट तयार केले जाणार आहे.
त्याकरिता सदर सर्वेक्षणात सर्वसामान्य जनतेचा सहभाग महत्वाचा असून सर्वेक्षणाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. याकरिता प्रत्येक गावातील ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शाळा, महाविद्यालयांनी गावकरी, विद्यार्थ्यांना या सर्वेक्षणात सहभागी होऊन आपल्या सूचना मांडण्याचे आवाहन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
नागरिक आपल्या सूचना https://wa.link/o93s9m या लिंकद्वारे दाखल करू शकतात.