ताज्या घडामोडी

योगाभ्यास दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

गडचिरोली, २१ जून : योगामुळे केवळ शारीरिक आरोग्य नव्हे, तर मानसिक स्थैर्य आणि शांततेचा अनुभव येतो. सोशल मीडियाचा अतिरेक, वेगवान जीवनशैली आणि इतर कारणांमुळे येणाऱ्या तणावावर मात करण्यासाठी योग हे अत्यंत प्रभावी साधन आहे. मात्र योगाचा खरा लाभ मिळवायचा असेल, तर तो आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवा असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे मुख्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खासदार नामदेव किरसान यांनीही या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “योगामुळे मनात सकारात्मकता निर्माण होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि ध्यानधारणेमुळे सखोल ज्ञानाची प्राप्ती होते. योग ही एक जीवनशैली आहे, जी दीर्घायुष्य आणि समाधान देणारी आहे.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे होते. या प्रसंगी प्र-कुलगुरु श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे आदी मान्यवर उपस्थित होते. योग प्रशिक्षक अंजली कुळमेथे आणि मिलिंद उमरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यक्रम विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वतंत्र कार्यक्रम घेण्यात आला. आरमोरी येथे झालेल्या कार्यक्रमास आमदार रामदास मसराम आणि माजी आमदार कृष्णा गजबे उपस्थित होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय एटापल्ली येथे प्रकल्प अधिकारी नमन गोयल यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. तसेच अहेरी, वडसा, कुरखेडा, कोरची, विविध शाळांमध्ये, तसेच योग संस्था आणि मंडळांच्या माध्यमातूनही जिल्ह्यात ठिकठिकाणी योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यापीठात आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सविता साधमवार यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा व विद्यापीठ प्रशासनातील एस.बी. बडकेलवार, घनश्याम वरारकर, चंद्रशेखर मेश्राम, नाजुक उईके, कुणाल मानकर, सुनील चंद्रे यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्ह्यातील नागरिक, खेळाडू, योगप्रेमी, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत योग दिनात उत्साहात भाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button