ताज्या घडामोडी

*गडचिरोलीत आशिया खंडातील सर्वात मोठ्या स्टील हबची उभारणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

गडचिरोली, दि. 7: आशिया खंडातील सर्वात मोठ्या स्टील हबची उभारणी गडचिरोलीत होणार असून यामुळे विदर्भ प्रदेश लवकरच औद्योगिक क्रांतीचा केंद्रबिंदू ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ 2025-खासदार औद्योगिक महोत्सवाच्या’ उद्घाटनप्रसंगी नागपूर येथे व्यक्त केला.
नुकत्याच दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रासाठी 15 लाख 70 हजार कोटींचे सामंजस्य करार झाले. यात विदर्भासाठी करण्यात आलेल्या 5 लाख कोटींच्या करारांमध्ये गडचिरोलीमध्ये जेएसडब्ल्यु उद्योग समुहाच्या 3 लाख कोटी गुंतवणूक कराराचा समावेश आहे. गडचिरोली हा आतापर्यंत नक्षलप्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जात असला, तरी आता औद्योगिक विकासामुळे त्याचे रूपांतर भारताच्या प्रमुख स्टील उत्पादन केंद्रात होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या गुंतवणुकीमुळे येथे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. लोखंड आणि पोलाद उद्योगासोबतच खनिज संपत्तीचा योग्य वापर करून जिल्ह्याचा आर्थिक विकास वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*गडचिरोलीत स्टील हब उभारल्याने संपूर्ण विदर्भाला फायदा*
गडचिरोलीतील स्टील हबमुळे भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या शेजारील जिल्ह्यांनाही मोठा फायदा होणार आहे. उद्योगांच्या वाढीसोबतच वाहतूक, पायाभूत सुविधा आणि नवीन तंत्रज्ञान क्षेत्रातही गुंतवणूक वाढणार आहे. यासोबतच गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने गडचिरोलीत उद्योगांच्या माध्यमातून गुंतवणूक ओढून आणत येथील नक्षलवाद, गरिबी, बेरोजगारी दूर करण्याच्या दिशेने कामाला सुरूवात झाली असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button