ताज्या घडामोडी

*दिव्यांग-अव्यंग जोडप्यास विवाह प्रोत्साहन लाभ वितरीत*

*दिव्यांग व्यक्तींनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पूढे यावे – आयुषी सिंह*

गडचिरोली दि. २० : दिव्यांग व्यक्तींकरिता शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत प्राधान्यक्रमानुसार पात्र असलेल्या 10 जोडप्यांना आज मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचे हस्ते जिल्हा परिषद सभागृहात प्रती जोडपे 50 हजार याप्रमाणे बचत प्रमाणपत्र, धनादेश व भेटवस्तू देण्यात आल्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

दिव्यांगांच्या सामाजिक सुरक्षिततेचा एक भाग म्हणून, दिव्यांग व्यक्तींना आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन मिळावे व विवाहासाठी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी याकरीता आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना जोडप्यांना ज्या प्रकारे आर्थिक सहाय्य दिले जाते, त्याप्रमाणे दिव्यांग व दिव्यांगत्व नसलेल्या विवाहीत जोडप्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत असल्याची माहिती श्रीमती सिंह यांनी दिली.
किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीशी सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यास योजनेचा लाभ दिला जातो. वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा, विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा अशी पात्रतेची अट आहे.
या योजनेंतर्गत प्रत्येक जोडप्यास रुपये २५ हजार चे बचत प्रमाणपत्र, रुपये २० हजार रोख स्वरुपात व रुपये ४ हजार ५०० चे संसार उपयोगी साहित्य / वस्तू खरेदीसाठी देण्यात येईल. तर रुपये ५०० स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येतात.
कार्यक्रमाला गायत्री सोनकुसरे, पुष्पा पारसे, रतन शेंडे, निलेश तोरे, निखील उरकुडे, माया गायकवाड व समाज कल्याण विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button